बाबाश्या...
मही माय म्हणली बाबाश्या,
कईता लिवणं इतकं सोपं असतं का?
तवा म्याबी कईता लिवीण
कईता लिवीण वांग्यातल्या अळ्यावर, कनगीतल्या जाळ्यावर
घरापुढच्या लंगड्या वट्ट्यावर तुह्या बाच्या हातावरल्या घट्ट्यावर,
बाबाश्या,
पुस्तुकावर मह्या फाटक्या चोळीच्या चित्राचं मुकप्रुष्ठ चालंल का?
तुह्या बाच्या उघढ्या छातीची प्रस्तावना सोभंल का?
रेखाटनं
चुलीच्या धुपनाची, कुजक्या ठाव्याची, भगुन्याच्या छिद्राची
जमवून घेऊ
पुस्तुक छापायला पैकं कितीबी लागू दी
नाहीतरीच आपल्या पडक्या भितीची अन जोत्याची
पांढरी माती
फुकाचीच जातीया...
(या कवितेस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचा १९९९ ला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे.
पूर्वप्रसिद्धी - दै. लोकमत, दै. लोकपत्र, परिवर्तन आणि अनेक दिवाळी अंक तसेच नियतकालिके)